नितिन पंडीत/भिवंडी
भिवंडी ( दि . ७ ) शिवसैनिक लपून चोरून उदघाटनाचे नारळ फोडत नाहीत , जे लोक जिल्हा परिषदेत पराभूत झाले आहेत तेच अशा प्रकारे लपून छपून उदघाटनाचे नारळ फोडतात अशी टिका व अप्रत्येक्ष टोला ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी भाजपला लगावला . नुकताच खारबाव गाणे फिरिंगपाडा रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते . दरम्यान खारबाव गाणे फिरिंगपाडा या काँक्रीट रस्त्याचे उदघाटन देखील ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांच्या शुभहस्ते पार पडले .
भिवंडीतील खारबाव गाणे फिरिंगपाडा या रस्त्यावर सध्या खड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत होता .नागरिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी एमएमआरडीए कडून या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे . एमएमआरडीए कडून मंजूर होणारा निधी हा नागरिकांनी शासनाला भरलेल्या कराच्या पैशातून विकास कामांसाठी खर्च केला जातो . मुख्यमंत्री जरी एमएमआरडीएचे अध्यक्ष असले तरी आमदार हे पदसिद्ध सदस्य असतात आणि स्थानिक आंदारांकडून एमएमआरडीएच्या कामांचा पाठपुरावा केला जातो. अशी माहिती देखील बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे यांनी यावेळीस आपल्या भाषणातून दिली . मात्र असे असतांना भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील हे जाणीवपूर्वक जिल्ह्यातील सर्वच कामांचे श्रेय घेतात , खासदारांनी आता तरी मी पणा सोडावा आणि एवढ्या वर्षात नेमकी काय केलं याचा अभ्यास करावा , असा सल्ला देखील सुरेश म्हात्रे यांनी भाजप खासदार कपिल पाटील यांना या कार्यक्रमादरम्यान दिला .
विशेष म्हणजे खारबाव गाणे फिरींगपाडा या रस्त्याचे उदघाटन भाजप कार्यर्त्यांनी काही दिवसांपूर्वी घाईघाईने शासकीय यंत्रणेला विचारात न घेता भिवंडी पंचायत समिती सभापतींच्या हस्ते नारळ फोडून केले होते , या घटनेचा समाचार घेत भाजप वाल्यांनी अशाप्रकारे चोरून छुपुन ट्रक भर जरी उदघाटनाचे नारळ फोडले तरी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवली आहे अशी विखारी टीका देखील ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांनी याप्रसंगी केली . तर आगामी लोकसभा आणि विधानसभेत देखील भाजप वाल्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे आवाहन देखील याप्रसंगी सुरेश म्हात्रे यांनी भाजपाला दिले आहे .
दरम्यान खारबाव फाटक रस्ता मार्च महिन्या अखेर पर्यंत मंजूर करून काम केले जाईल असे आश्वासन देखील सुरेश म्हात्रे यांनी दिले. या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक , जिप सदस्या रत्नाताई तांबडे , भिवंडी पंचायत समितीच्या उप सभापती वृषाली विशे, भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता दत्तु गीते , भिवंडी पंस सदस्या प्रगती पाटील , पंस सदस्या नमिता पाटील , पंस सदस्य अंकुश पाटील , खारबाव ग्राम पंचायतीच्या सरपंच मोहना सुधीर पाटील , उपसरपंच मनोज कृष्णा पाटील , सदस्य अशोक पालकर , रमेश तरे, नागेश मुकादम , नितीन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते .


No comments:
Post a Comment